सोलापूर- शहरातील मिळकत धारकांना आता घरबसल्या आपल्या मिळकत पत्रिकेची प्रत मिळू शकणार आहे. नगर भूमापन कार्यालयाने (EPCIS इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी कार्ड इन्फॉमेशन सिस्टम) प्रणालीचा अवलंब केला असून या प्रणालीमुळे मिळकत धारकांना ऑनलाईन मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध होणार आहे. येत्या 1 एप्रिल 2020 पासून ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांनी सांगितले.
केंद्र सरकारचा भूमी अभिलेख सुधारणा कार्यक्रम आणि जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या कल्पनेतून नगर भूमापन कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमातून भूमीअभिलेख कार्यालयातील सर्व माहितीचे संगणकीकरण केले जाणार आहे. नगर भूमापन कार्यालयाने या प्रणालीत 35 हजार 159 मिळकतीची माहिती भरण्यात आली आहे. ही माहिती मूळ मिळकत पत्रिकांशी पडताळून पाहिली जाणार आहे.
हेही वाचा -सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची निवड
माहिती तपासणी झाल्यानंतर संपूर्ण डाटा डिजीटल साईन करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. डाटा डिजीटल साईन करण्याचे काम मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मिळकत धारकांना मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत, असेही किरण कांगणे यांनी सांगितले.
हेही वाचा -सोलापूरच्या महापौरपदी श्रीकांचना यन्नम, शिवसेना-काँग्रेसकडून माघार
सध्या नगर भूमापन कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या रुममध्ये मिळकत पत्रिका आणि अनुषंगिक माहिती, कागदपत्रे, नकाशे यांची माहिती शास्त्रीय पध्दतीने जतन करण्यात आली आहे. त्यामुळे मिळकत पत्रिका संबंधातील कोणताही संदर्भ लगेचच शोधून काढणे शक्य होणार आहे. राज्य शासनाकडून नगर भूमापन कार्यालयाला एप्रिल 19 ते मार्च 20 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचे महसूल उद्दीष्ट दिले होते. मात्र, 8 महिन्यातच नगर भूमापन कार्यालयाने 1 कोटी 20 लाख रुपयांचा महसूल वसूल केला आहे. येत्या 4 महिन्यात नगर भूमापन कार्यालय महसूल उद्दीष्टाचा आणखी पुढील टप्पा गाठेल, असा विश्वास मनपा मिळकत विभागाला आहे.