सोलापूर - सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीच्या यादीत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. पण धीम्या गतीने स्मार्ट सिटीच्या कामकाजावर अनेक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. शहरात चौकाचौकात खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. नगरोत्थान योजनेतून ड्रेनेजचे काम सुरू आहे. पण शहरातील कन्ना चौक येथे पिण्याच्या पाईपलाईनवरच ड्रेनेज चेंबर बांधल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत काम थांबवले आहे. कारण, पिण्याच्या पाईपलाईनवर ड्रेनेजचे चेंबर असेल तर भविष्यात नळातून घाण आणि मैला मिश्रित पाणी येऊ शकते, असे नागरिकांचे मत आहे. कोरोना महामारीत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता या भोंगळ कारभारमुळे नव्या साथीच्या रोगांना नागरिक बळी पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
साथीचे रोग पसरून 2 लाख लोकांना फटका बसण्याची शक्यता
पिण्याच्या पाईपलाईनवर ड्रेनेज चेंबर बांधल्याने साथीचे रोग किंवा कॉलरा यासारखे भयानक रोग पसरण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात साथीचे आजार पसरले तर कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जवळपास दोन ते अडिच लाख नागरिकांना या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व नागरिकांना याचा फटका बसू शकतो. गेल्या वर्षभरात 22 नागरिकांचा कोरोना आजारव्यतिरिक इतर साथीच्या रोगाने मृत्यू झाला आहे.
सोलापूरकर स्मार्ट सिटीच्या कामावरून संतप्त