सोलापूर- बालविवाह रोखण्यासाठी कायदा आहे. पण, समाजात आजही काही ठिकाणी बालविवाह यासारख्या प्रथा सुरूच आहेत. मुलींचे आई-वडील देखील मुलींचे वय कमी असतानाही बालविवाह करुन संबंधित प्रतिबंधक कायद्याला हरताळ फासत आले आहेत.
माढा तालुक्यातील भुताष्टे गावात मंगळवारी (दि. 3 डिसें.) होणारे दोन बालविवाह विवाह राखण्यात माढा पोलीस आणि माढा पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाला यश आले. एका मुलीचे 15 तर दुसऱ्या मुलीचे 17 वय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भुताष्टे गावात मंगळवारी दुपारी 12.38 वाजता दोन अल्पवयीन मुलींचा बालविवाह होणार असल्याची तक्रार लग्नपत्रिकेसह अज्ञात व्यक्तीकडून माढा तहसील, माढा पोलीस, चाईल्ड लाईन व पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली होती. माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी या तक्रारीची दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार महिला बालकल्याण विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे, माढा पोलीस ठाण्याचे एम.एन लोंढे, एन.व्ही घोळवे यांनी दखल घेत गावात जाऊन याविषयी अधिक माहिती व चौकशी केली. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलींचे लग्न मंगळवारी होणार असल्याचे समोर आल्याने तक्रारीत तथ्य आढळले. मंगळवारी दुपारी 12.38 वाजता लग्न होणार असल्याने गावातील सलगर वस्ती येथे लग्नाची तयारी करण्यात आली होती. सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडणार होता. त्या अगोदरच पोलीस व प्रशासनाने हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.