सोलापूर - मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका ९ वर्षाच्या लहान मुलीबरोबर बालविवाह ( Child Marriage in Solapur ) करून देव कार्यासाठी तीर्थक्षेत्राला गेलेल्या कोन्हेरी येथील त्या नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलीच्या आईवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी व आई गायब झाले आहे. मोहोळ पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत. आय लव्ह यु बायको असे व्हाटसअप स्टेटस ठेवल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. स्टेटस पाहून एका अज्ञात व्यक्तीने महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड लाईनला महिती दिली होती.
बाल विकास कल्याण समितीच्या सुवर्णा बुंदाले यांची प्रतिक्रिया - नात्यातच संगनमताने विवाह उरकून टाकला -
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेनूर (ता. मोहोळ) येथील एका नऊ वर्षाच्या मुलीबरोबर दि. ३० नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके (वय २१) याचा बालविवाह झाला होता. मुलीची आई व मुलाचे आई वडील यांनी संगनमताने केला होता.
'आय लव्ह यु बायको' स्टेटस ठेवल्यामुळे बालविवाह उघडकीस -
नवविवाहीत जोडपे देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्राला गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर ‘आय लव बायको’ असे स्टेटस ठेवले होते. त्या ठेवलेल्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढून अज्ञात व्यक्तीने सोलापूर येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाईन १०९८ या संपर्क क्रमांकावर फोन करत या बालविवाहाची माहिती दिली.
चौघाजणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलिसाशी संपर्क करत त्या ठिकाणाहून पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन कोन्हेरी येथे जाऊन चौकशी केली.अविनाश याने त्याच्या नातेवाईकाची नऊ वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके व पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ , १० , ११ , भारतीय दंड विधान कलम ३४ अन्वये अतुल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मुलीची आई व पीडित मुलगी सध्या बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
हेही वाचा -Husband Killed Wife In Matheran : माथेरान येथे 'त्या' शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली; पतीच निघाला मारेकरी
हेही वाचा -Mokshada Ekadashi Special : विठ्ठल रुक्माई मंदिरात नयनरम्य फुलांची आरास, ऊबदार पोशाख विठुरायाला परिधान