सोलापूर -पाच लाखांच्या खंडणीसाठी सोलापूरमधल्या बसवेश्वर नगर येथील सहा वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. याबाबतची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे.
यश दीपक कोळी असे अपहरण करण्यात आलेल्या या चिमुकल्याचे नाव आहे. आरोपीने बसवेश्वर नगरमधून दीपकचे अपहरण केले व त्याच्या वडिलांना 5 लाख रुपये घेऊन स्मशानभूमीत बोलावले. मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच दीपक कोळी यांनी याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्वरित हालचाल करून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपी सागर गायकवाड याचा शोध घेऊन, मुलाची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी आरोपीला केले अटक
होटगी रोड येथील साखर कारखान्याजवळ बसवेश्वर नगरात सोमवारी ही घटना घडली होती. दीपक शिवाजी कोळी यांचा मुलगा यश दीपक कोळी (वय 6 वर्ष, रा.बसवेश्वर नगर, होटगी रोड, सोलापूर) हा सायंकाळी मंदिरात असलेल्या कार्यक्रमासाठी गेला होता. पण रात्री 8 वाजले तरी घरी परतला नाही. वडील रेल्वे गोडावूनमध्ये हमाल म्हणून काम करतात. घरी परतल्यावर त्यांनी सर्व ठिकाणी मुलाचा शोध घेतला. मात्र यश काही मिळाला नाही. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून दीपक कोळी यांना कॉल आला. मुलगा सुखरूप पाहिजे असल्यास पाच लाख रुपये आणून द्या. पैसे घेऊन स्मशानभूमीत या, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी दीपक कोळी हे घराशेजारी असलेल्या स्मशानभूमीत धावतच गेले. मात्र त्यांना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.