पंढरपूर- पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला. विठ्ठल मारुती चव्हाण आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण यांनीही विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली.
विठुनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी, मुख्यमंत्र्यांनी केली सहपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली.
आषाढी आणि कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. शिवाजी महाराजांच्या काळात हा मान महाराजांकडे होता. त्यानंतर महापूजेचा मान हा साता-याच्या गादी कडे सोपवण्यात आला. इंग्रजांच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा मान मिळत असे. त्यानंतर स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा मान आला. त्यानुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते, तर कार्तीकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा तब्बल 15 लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. तासंतास रांगेत उभे राहून भावीक पांडुरंगाचे दर्शन घेत आहेत.