पंढरपूर- आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, असे साकडे विठ्ठल-रुक्मिणी मातेला घातले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. पूजेनंतर ते बोलत होते.
प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शासकीय पूजेचा मान मिळालेले वीणेकरी विठ्ठल बडे दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा मोजक्याच पालख्यांना परवानगी देण्यात आली होती. तसेच शासकीय पूजाही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली. या एकादशीच्या निमित्ताने, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने, विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या, पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'मला शासकीय पूजा करण्याचा मान मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. पण विठ्ठलाच्या कृपेने ही संधी मिळाली. सद्या जगावर कोरोनाचे संकट आहे. हे संकट आजपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून लवकर दूर कर, असे साकडे मी विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला घातले आहे.'
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी आहे. यामुळे यंदा विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात 30 जूनपासून 2 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.