पंढरपूर- विठ्ठलाकडे काय मागणार, तो तर मनातील सर्व काही जाणतो. तरीही मनातील हूरहूर विठ्ठलाकडे मांडली. माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी सुखी होऊ दे. दुष्काळमुक्तीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे, अशी मागणी विठूरायाकडे केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी सुखी व्हावा, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाकडे मागणे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आज अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक वारी सुरू आहे. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हे काम खूप मोठे आहे, मात्र, लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पंढरपुरात आलो की एक सकारात्मक वातावरणाचा भास होतो. गेल्या वर्षी काही कारणामुळे पंढरीत विठ्ठलपूजा करता आली नाही, याची खंत नाही. कारण कदाचित विठ्ठलाच्या मनातच असावे, की पुढील वर्षी येईन तेव्हा सत्कार होईल. मला एका गोष्टीचे समाधान आहे की, पाच वर्षामध्ये आलेल्या आव्हानांना प्रामाणिकपणे सकारत्मकतेने आम्ही पुढे गेलो. या कामामध्ये विठुरायाच्या आशिर्वाद लाभला, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.