माढा (सोलापूर) - कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या परिस्थितीत ग्राहकांना मात्र चिकनच्या वाढलेल्या दरांचा फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. चिकनमधून आवश्यक प्रथिने मिळत असल्याने प्रत्येक जण स्वत:हसह कुटुंबातील सर्वांना चिकन आवडीने जेवणात देत आहेत. परिणामी ग्राहकांची वाढती मागणी अन् कुक्कुटपालन संगोपनाच्या खर्चात देखील वाढ झाल्याने चिकनची दरवाढ झाली आहे.
कुकुट्टपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सध्या अच्छे दिन
१४० ते १६० रुपये प्रतिकिलो असलेला चिकनचा दर २५० रुपयांवर पोहोला आहे. तसेच निम देशी कोंबडीचे दर मात्र वाढलेले नाहीत, ते २०० रुपये प्रतिकिलो तर देशी कोंबडीचे दर ३५० ते ४५० पर्यंत गेलेत. त्यामुळे बाॅयलर(पक्ष्याचे)कुकुट्टपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सध्या अच्छे दिन आलेत.
3 महिन्यांपूर्वी बर्ड फ्लू संसर्गामुळे चिकनच्या मागणीत मोठी घट झाली होती. कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत सापडले होते. त्यांनी या संकटामुळे पक्ष्यांचे पालन करणे देखील थांबवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच डाॅक्टरही कोराना बाधितांना चिकन, अंडी खाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र एकीकडे मागणीत वाढ झाल्याने दुसरीकडे कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी चिकनचे दर वाढू लागले आहेत.
चिकनचे का वाढलेत दर ?
कोरोनाचा वाढीस लागलेला संसर्ग, अचानक चिकनच्या मागणीत झालेली वाढ, जिवंत कोंबड्यांचा तुटवडा, कोंबड्यांचे महागलेले खाद्य, उन्हाळ्यात वजन वाढत नाही, संगोपनाचा खर्च वाढल्याने त्यामुळे उत्पादन खर्चही वाढला. या सर्वाचा परिणाम चिकनच्या दरवाढीवर झाला आहे.