सोलापूर -कुरुल-मोहोळ महामार्गावर ज्वलनशील केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. हा अपघात रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
कुऱ्हाडीने टँकरचे दार तोडून चालकाचा वाचविला जीव-
कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या वैष्णवी ढाब्यासमोर रविवारी सकाळी केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने आग लागली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारून आपला जीव वाचवला. पण टँकरमधील चालकाला बाहेर पडता येत नव्हते. स्थानिक नागरिकांनी कुऱ्हाडीने टँकरचे दार तोडून त्याला बाहेर काढले आणि टँकर चालकाचा जीव वाचवला.