पंढरपूर- राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलचरणी साकडे - nanda omase
यावेळी शासकीय पुजेचा मान मानाचे वारकरी म्हणून श्री सुनील महादेव ओमासे (वय 42 ) पत्नीचे नाव नंदा सुनिल ओमासे (वय 35) यांना मिळाला. ते 2003 पासून सलग पंढरपूरची वारी करत असून व्यवसायाने ते शेतकरी आहेत.
यावेळी बोलताना पाटील यांनी, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे’.गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला.वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले.पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान कार्तिक वारीच्या पूर्वसंध्येला चंद्रकांत पाटील पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बा विठ्ठ्ला आमचे काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर अशी विनवणी विठ्ठलाकडे करणार असल्याचे ते म्हणाले होते.