सोलापूर-मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलावी, जोपर्यंत ते परप्रांतीयांबद्दलची आपली भूमिका बदलत नाही, तोपर्यंत निवडणुकीमध्ये भाजप मनसेची युती होऊ शकत नाही. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते सोलापूरमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी नवे कृषी कायदे, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, धनंजय मुंडे, मराठा आरक्षण अशा सर्वच विषयांवर प्रतिक्रिया दिली.
भाजप व मनसे एकत्र येणे शक्य नाही
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलणे गरजेचे आहे. 80 टक्के मराठी माणसांना नोकरी देण्याचा कायदा आहे. मग रिक्षा व टॅक्सीवाल्या बिहारींना राज ठाकरे अटकाव का करतात. त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र जोपर्यंत राज ठाकरे आपली परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत मनसेसोबत युती होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.