सोलापूरChandrakant Patil Ink Throw : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी प्रथमच जिल्ह्यात आले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. शासकीय नोकरभरतीचं खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं : या घटनेनंतर पोलिसांनी भीम आर्मी संघटनेचा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं. जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटील यांचा सोलापुरात विरोध सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. रविवारी संध्याकाळी चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात येणार होते. त्या आधी विश्रामगृहाला अक्षरश: छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या दरम्यान भीम आर्मीच्या अजय मैंदर्गीकर यानं सुरक्षा भिंत तोडून चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली. यावेळी भीम आर्मीच्या पादाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरती विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला.