पंढरपूर(सोलापूर) -पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील दिग्गज नेते पंढरपुरात हजेरी लावणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी कडूनही आज (दि. 29 मार्च) उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांनी उपस्थित राहणार आहेत.
भगीरथ भालके यांची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात
दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र व विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज (सोमवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, 30 मार्चला हा पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीतील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीतील उमेदवाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारीची माळ भगीरथ भालके यांच्या गळ्यात पडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे जयंत पाटील व भाजपाचे चंद्रकांत पाटील उद्या पंढरपूर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी भरताना उपस्थित असणार आहेत. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या उमेदवारी अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सोबत असणार आहेत. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवारी वेगळी धुळवड पाहायला मिळणार आहे.
महाविकासआघाडी समोर घटक पक्षांची नाराजी दूर करण्याचे आव्हान
महाविकासआघाडीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी भरताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असणार आहेत. त्याच प्रमाणात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील व शिवसेनेचे बंडखोर नेते शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे घटक पक्षातील नाराजी दूर करण्याचे काम जयंत पाटील यांना करावे लागणार आहे. पंढरपूर पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा -पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी
हेही वाचा -होळकर विद्यापीठाची स्मार्ट विद्यापीठाकडे वाटचाल; १ कोटी २० लाख रुपये खर्चून उभारला अत्याधुनिक स्टुडिओ