पंढरपूर (सोलापूर) -इंदापूर तालुक्याला उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी येण्याचा अध्यादेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून रद्द करण्यात आला आहे. त्या संदर्भातील घोषणा मंगळवारी 18 मे रोजी जयंत पाटील यांनी पुण्यात केली होती. त्याच निर्णयाचे स्वागत करण्यासाठी उजनी बचाव समितीकडून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी परिसरातील नामदेव पायरीजवळ विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चंद्रभागेच्या पाण्याचा अभिषेक करण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य माऊली हाळणवर, दीपक भोसले दीपक वाडदेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला चंद्रभागेच्या पाण्याचा अभिषेक -
उजनी जलाशयातून इंदापूरच्या 22 गावांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला. उजनी पाण्यासंदर्भात गेल्या एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व इतर पक्षांकडून जोरदार राजकारण सुरू होते. त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती. त्यातच उजनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती. मंगळवारी जयंत पाटील यांनी तो निर्णय रद्द केला. यानंतर समितीकडून चंद्रभागा नदीपात्रातून पाणी आणून नामदेव पायरीजवळ श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पाण्याचा अभिषेक घालण्यात आला.