सोलापूर - पंढरपूरच्या विठ्ठल रुख्माई मंदिरात मूर्तीला चंदनउटीचा लेप लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी ही उपाय योजना केली जात असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विठ्ठल- रूख्माई मंदिरात चंदनउटीस प्रारंभ; उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी केली जातेय उपाययोजना - चंदनउटी
पंढरपूरच्या विठ्ठल रुख्माई मंदिरात मूर्तीला चंदनउटीचा लेप लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी ही उपाय योजना केली जाते.

उष्णतेची दाहकता चैत्र महिन्याच्या सुरूवातीपासूनच जाणवू लागली आहे. वाढत्या उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढरपूरच्या विठूरायाच्या चंदनउटी पूजेला पाडव्यापासून सुरूवात झाली आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंदिर समितीने कर्मचाऱ्यांवरील चंदन उगाळण्याचा ताण कमी करण्यासाठी अद्ययावत मशिन देखील आणले आहे.
मूर्तीच्या चंदनउटी पूजेसाठी ७५० ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येते. आगामी तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ लक्षात घेता विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी चंदनाचा लेप विठ्ठल मूर्तीच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. याकामी लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत या चंदनउटीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते. विठुरायाच्या पोषाखावेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्यामूर्तीप्रमाणे रुक्मिणीमूर्तीस याच पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली.