सोलापूर -पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विशेष पथकाने म्हैसगाव-शिराळा येथील बंधाऱ्यातून अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये दोन ब्रास वाळूसह तीन ट्रॅक्टर, एक टेम्पो जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैधरित्या वाहतूक होणारी दोन ब्रास वाळू जप्त, आठ जणांवर गुन्हा दाखल - सोलापूर अवैध वाळू उपसा न्यूज
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढही होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आता वाळू माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.
पोलीस दलाच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक विनय बहिरे, कॉन्स्टेबल मनोज राठोड, कल्याण भोईटे, सतीश एकगुटे यांच्या पथकाने म्हैसगाव-शिराळा बंधाऱ्यामध्ये छापा मारला. त्यावेळी तीन ट्रॅक्टर व एक टेम्पो वाळूची वाहतूक करत असल्याचे निदर्शास आले. पोलिसांनी दोन ब्रास वाळू सह एकूण २१ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. घटनास्थळी असलेल्या आठ जणांपैकी चार जण पळून जाण्यात यशस्वी ठरले तर, चार जणांना अटक करण्यात आले.
या कारवाईमध्ये सागर बोरकर (वय २०), संतोष बोरकर (वय ३४), दिपक जगताप (वय ३२) , योगेश गिरी (वय ३०), बंडू सरवदे यांंना अटक झाली. आठ जणांविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या चार जणांचा शोध घेतला जात आहे.