महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा नेते नारायण राणेंना मुख्यमंत्र्या बाबत अपशब्द वापरणे पडले महागात; सोलापुरात गुन्हा दाखल

भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर अर्वाच्च भाषा वापरली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

cm uddav thackeray, narayan rane (file photo)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे (संग्रहित)

By

Published : Oct 30, 2020, 8:26 AM IST

Updated : Oct 30, 2020, 8:41 AM IST

सोलापूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात नारायण राणे, त्यांचे पुत्र माजी खासदार नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केली. यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाला उत्तर देताना भाजपाचे नारायण राणे यांनी अर्वाच्य भाषा वापरली. याप्रकरणी बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी तक्रार दिली. यानंतर राणे यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...तर पुतळा दहन करण्याचा दिला इशारा

गुन्हा दाखल न केल्यास राणे यांच्या पुतळ्याचे दहन करू, असा इशारा देत पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना आंधळकर यांनी निवेदन दिले होते. यावेळी शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता जाधव, मनीष चव्हाण, बापू काळे, आदी. उपस्थित होते.

काय म्हणाले होते राणे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कारभार चालवतात. ठाकरे पिंजऱ्यामधील वाघ की, बाहेरचा वाघ आहेत? असा सवाल नारायण राणेंनी केला. उद्धव ठाकरे पुळचट मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बाळासाहेबांना छळले आहे, असा आरोप राणे यांनी केला. महाराष्ट्राच्या प्रगत राष्ट्राला मंद मुख्यमंत्री लाभला आहे. मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवा. मुख्यमंत्र्यांना घटना माहिती नाही. त्यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे आहे. गेल्या 39 वर्षांत सेनेत अनेक केसेस आम्ही अंगावर घेतल्या, तुम्ही काय केले? मातोश्रीच्या आतल्या गोष्टी आम्ही बाहेर काढल्या तर कपडे घेऊन पळायची वेळ येईल. थापेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही तुम्हाला मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खेळण्यातील मुख्यमंत्री आहेत. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिनचीट दिली. मात्र, सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे. स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानाखाली तरी दिली आहे का? या शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली होती.

उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका -

याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणांत मुख्यमंत्री ठाकरेंनी नारायण राणें यांचे नाव न घेता बेडूक संबोधले होते. शिवाय त्यांच्या दोन्ही मुलांना अप्रत्यक्षपणे लक्ष केले. राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी नव्या तारखा दिल्या जात आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसेच आम्ही तुमच्यासारखे सत्तेच्या ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाहीत, अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपावर केली. ते म्हणाले, सत्तेत आल्यापासून आमच्यावर आरोप केले जात आहेत. खोटेनाटे आरोप करताना शिवसेना गप्प कशी? असे विचारले जाते. याचे उत्तर आज मी देतो असे म्हणत काही लोक गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटून बसतात, तसे बसून असतात. आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाहीत. आमच्या वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो, हे दाखवू' असे सांगत 'हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा', असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपाला दिले होते.

Last Updated : Oct 30, 2020, 8:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details