सोलापूर- तीन जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला अखेर सोलापूर वन विभागाने शार्प शूटरच्या मदतीने गोळ्या घालून ठार केले. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी शिवारात राखुडे वस्ती मधील एका केळीच्या शेतात या नरभक्षक बिबट्याचा वेध घेण्यात आला. त्यामुळे करमाळाकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, करमाळा तालुक्यासह इतर जिल्ह्यात आणखी काही नरभक्षी बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक बिबट्या मारला. मात्र, मानवी वस्तीत वावर असलेल्या इतर बिबट्यांना कधी जेरबंद करणार? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
करमाळा तालुका खरंच बिबट्या मुक्त झाला का?-
करमाळा तालूका हा उजनी धारणाच्या मागील बाजूस आहे. धरणाचे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी बागायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बिबट्यास लपण्यास योग्य परिसर आहे. याअगोदर दोन वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे एका बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले होते. आणि आता नुकताच 'सोनबा' या नरभक्षक बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती. गेल्या 3 डिसेंबरपासून सोलापूर वन विभागाने याचा शोध सुरू केला होता. वन विभागाने प्रशासनास अहवाल दिला होता की, करमाळा परिसरात एक बिबट्या नसून दोन ते तीन बिबटे आहेत. त्यानंतर शुक्रवारी 18 डिसेंबरला एका नरभक्षी बिबट्याची शिकार करण्यात आली. पण मात्र, १२ जणांचा बळी घेणार हा तोच बिबट्या होता का? किंवा अन्य बिबट्यांचाही या १२ जणांवर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता, आणि असला तर वनविभागाच्या अंदाजानुसार अन्य २ बिबटे कधी जेरबंद केले जाणार असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे एका बिबट्याच्या शिकारीनंतर करमाळा खरच बिबट्या मुक्त झाला का? असा मुख्य प्रश्न आता चर्चेत आला आहे.
एका बिबट्याचा खात्मा; पण करमाळा खरच बिबट्या मुक्त झाला का? बारा जणांचा बळी या बिबट्याने घेतला होता- सोलापूर, बीड, अहमदनगर या तीन जिह्यात बिबट्याने 12 व्यक्तींना ठार केले होते. सोलापूर मधील करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात देखील तीन जणांचा जीव बिबट्याने घेतला होता. हा नरभक्षक का झाला? याला मानवी रक्त का आवडले? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत अधिक माहिती नाही. पण तो नरभक्षक झाला, याचा खात्मा करणे गरजेचे आहे. एवढेच ध्येय समोर होते, त्यातूनच त्याची शिकार करण्यात आली.
एका बिबट्याचा खात्मा; पण करमाळा खरच बिबट्या मुक्त झाला का? डार्टगनने त्याला बेशुद्ध करता आले असते; मग ठार का केले?-बिटरगावच्या वांगी शिवारात असलेल्या राखुडे वस्तीवर केळीच्या शेतात बिबट्या लपून बसला होता. शार्प शूटरने डॉगस्क्वाडच्या मदतीने त्याचा शोध लावला. शार्प शूटर अगदी वीस फुटावर आले. डार्ट गनची गोळी मारून त्याला बेशुद्ध करून त्याला जेरबंद करता आले. मात्र, यावेळी याबिबट्यास बेशुद्ध न करता थेट बंदुकीच्या गोळीने त्यांचा वेध घेण्यात आला.