सोलापूर - बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल 32 वर्षे शिक्षकी नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमसिद्ध भिकप्पा बिराजदार असे शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षका विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अहेरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होता. सद्या त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू आहे.
आरोपी आमसिद्ध बिराजदार याने 32 वर्षांपूर्वी नोकरीत रुजू होताना मुंबई येथील एस. के. सोमय्या डीएड महाविद्यालयातुन डीएड पूर्ण केले, असे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक सादर केले होते. या प्रमाणपत्रावर प्राचार्य पाटील यांनी सही केल्याचे नमूद होते. मात्र, चौकशी अंती 1982 ते 1989 या कालावधीत त्या महाविद्यालयात कोणतीही पाटील नावाची व्यक्ती प्राचार्य नव्हती. या कालावधीमध्ये त्या महाविद्यालयात कांताबेन आशार या प्राचार्य असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपी शिक्षक बिराजदार याने मुबंई येथील ज्या महाविद्यालयाचा दाखला दिला आहे ते महिला महाविद्यालय असल्याची माहिती समोर आली आहे.