पंढरपूर- शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह प्रमुख बाजारपेठांमधील मोबाईल व्यावसायिकांनी चीनी वस्तूंच्या जाहिरातीचे फलक काढून फेकले. त्या जागी व्यावसायिकांनी मेड इन इंडियाचे फलक झळकावले आहेत. त्यामुळे आता पंढरपुरात मेड इन इंडियाची क्रेज दिसून येत आहे. त्यासाठी मनसेच्या वतीने सर्व व्यावसायिकांना निवेदन देण्यात आले होते.
लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनचा निषेध करुन कोंडी करण्यासाठी चीनी मालावर बहिष्कार टाकण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून पंढरपूर व्यापारी समिती व मोबाईल असोसिएशनच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंढरपूर शहरात चीनी मोबाईल विक्री व दुरुस्ती न करणे, तसेच शहरातील प्रत्येक दुकानवरील चीनी कंपनीचे फलक काढून तिथे मेड इन इंडियाची फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.