सोलापूर - अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या मालकाचे ओझ खांद्यावर घेऊन शेतकामात मदत करणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अर्थात 'बैल पोळा'. मात्र, सोलापूरातल्या माढा तालुक्यात फक्त पोळ्यालाच नाही, तर रोज बैलाची पुजा केली जाते. येथील रिधीरे गावच्या धनाजी भानुदास गायकवाड या शेतकऱ्यांने आपल्या मृत्यू झालेल्या लाडक्या बैलाची शेतात समाधी बांधली आहे. ते रोज या समाधीचे दर्शन घेतात. तसेच दरवर्षी हे कुटूंब बैलाची पुण्यतिथी देखील साजरी करताच.
आजारपणामुळे झाला होता मृत्यू -
धनाजी गायकवाड यांच्या राजा नावाच्या बैलाचा आजारीपणामुळे मृत्यू झाला होता. मृत्यु झालेल्या दुसऱ्याच दिवशी गायकवाड कुटुंबाने राजाची समाधी बांधली. तेव्हापासून ते नित्यनियमाने दररोज त्याच्या समाधीचे दर्शन व पुजा करुन दिवसांची सुरुवात करतात. तसेच दरवर्षी बैलाची पुण्यतिथीदेखील साजरी केली जाते. यंदादेखील बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी धनाजी गायकवाड यांनी राजा बैलाच्या आठवणींना उजाळा दिला.