सोलापूर - मदिरेचे दार उघडले पण मंदिरांचे नाही, असा भेदभाव सरकारने का केला. भाविकांना व भक्तांना वाळीत का ठेवले. उद्धवा धुंद तुझे सरकार! मंदिरांचे दार कधी उघडणार. दारू नको! दार उघड, अशी मागणी करत भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग वाजवून आंदोलन केले.
मंगळवारी सकाळी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर मंदिर भक्तांसाठी खुले करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली पण मंदिरांचे दार नाही. राज्य सरकारने भक्तांसोबत व देवासोबत भेदभाव केला आहे. गेल्या साडे सहा महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. भाविकांनी अनेकवेळा मागणी करूनही मंदिरे सुरू करण्यात आलेली नाही, असे म्हणत भाविकांनी घंटानाद आंदोलन केले. तरीही महाविकास आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार! अशी अवस्था झाली असल्याची टीका देखील या आंदोलनात करण्यात आली.