सोलापूर- सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. यासाठी दक्षिण सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामाअस्त्र उगारले आहे.
सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवू नये, भाजप कार्यकर्त्यांची मागणी
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये अशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली असून यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास ३० सरपंचांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे.
सध्या आपल्या नेत्याला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी आंदोलने करणे, पक्षश्रेष्ठींकडे निवेदन देऊन आपलाच नेता कसा योग्य आहे हे दाखवण्याची सगळीकडे स्पर्धा लागलेली आहे. असे असताना सोलापुरात मात्र नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू नये, अशी मागणी सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
माढ्यातून लोकसभा लढवू नये यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास ३० सरपंचांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. तर शहरातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे देण्याची तयारी दाखवली आहे. सुभाष देशमुख हे राज्य पातळीवरील नेतृत्त्व असल्याने त्यांना पक्षातीलच काही असंतुष्टांकडून जाणीवपूर्वक दिल्लीला पाठविण्याचा घाट घातला जात आहे. शिवाय देशमुखांनी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामेही केली आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा लढविण्याचीच तयारी करावी, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.