सोलापूर- अक्कलकोट तालुक्यात भाजप नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी विरोधी पक्षातील लोकांबद्दल किंवा विकासाबद्दल बोलण्याऐवजी भाजपच्याच नेत्यांवर तोंडसुख घेतले. अक्कलकोट विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधी गटातील भाजपच्या लोकांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावून सचिन कल्याणशेट्टी यांचा पत्ता कट करण्याचा डाव टाकला आहे.
अक्कलकोट विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 2 देशमुखात असलेली राजकीय दरी या ठिकाणीही पाहायला मिळाली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांना डावलून विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख म्हणाले की, पक्षात कुरघोडी करणारा नेता संपतो. मात्र, कार्यकर्ता संपत नाही, हे प्रत्येक नेत्यांनी लक्षात ठेवले. उमेदवारी कोणाला द्यायची, हे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी ठरवलेले आहे. त्या पद्धतीने मतदारसंघात सर्वे चालू आहे. या सर्वेमध्ये जनता जनार्दन ठरवेल, त्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न पक्षाचा राहील. इच्छुकांनी आपल्या स्तरावरील गट-तट व वाद मिटवून माझ्यापर्यंत आल्यास त्याला निश्चितच उमेदवारी देण्याबाबत विचार करु, असे सांगत पक्षाने ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. त्याचे सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.
अक्कलकोट तालुका विकासापासून वंचित असून तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी तालुक्यात भाजप आमदार निवडून येणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.