सोलापूर- जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही कोरोनावरील उपायायोजनांवर लक्ष दिले नाही. कोरोनाच्या परिस्थितीबाबत विचारले असता अचारसंहितेचे कारण देत जाबाबदारी झटकली. एवढ्यावर न थांबता सोलापूरच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे)कडे वळवत सोलापूरकांना मामा बनविले, अशी टीका करत भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी काळे कपडे घालत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध केला. पालकमंत्री बदला आणि काँग्रेसच्या स्थानिक आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा, अशीही मागणी करण्यात आली.
तातडीने रेमडेसिवीर अन् ऑक्सिजनचा पुरवठा करावा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना सारख्या भयंकर महामारीत सोलापूरकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आचारसंहितेचे कारण समोर करत सोलापूरकरांची थोडीही मदत केली नाही. पालकमंत्र्यांनी ताबडतोब ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडची व्यवस्था करावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी मागणी भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी केली.