सोलापूर (पंढरपूर) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे 1 लाख 9 हजार 450 मत घेऊन विजयी झाले आहेत. निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे (महाविकास आघाडी) भगीरथ भारत भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. समाधान अवताडे हे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. यामधील शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैलजा गोडसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील त्या दोघांना मिळून अडीच हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत. या मतदारसंघात एकूण 2 लाख 27 हजार 421 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
समाधान आवताडे यांना पंढरपुरातून आघाडी तर मंगळवेढ्यातून पिछाडी
पंढरपूर शहर व तालुक्यातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना एक हजार मतांची आघाडी मिळाली तर मंगळवेढा शहरातून समाधान आवताडे यांना साडेचार हजार मतांची पिछाडी असल्याचे दिसून आले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे विजयी झाले आहे. मात्र, पंढरपूर शहर व तालुक्यातील गेल्या निवडणुकीत दिवंगत आमदार भारत भालके यांना सुमारे साडेसहा हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे भगीरथ भालके पंढरपूरमधून आघाडी मिळेल असे वाटत होते. मात्र, समाधान आवताडे यांना एक हजार मतांची आघाडी पंढरपूर शहरातून मिळाली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीचा फायदा समाधान आवताडे यांना झाल्याचे दिसून आला.
विकासकामांना देणार प्राधान्य
भाजपचे समाधान आवताडे विजयानंतर बोलताना म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कमी प्रमाणात मते मिळाली आहेत. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचीत आमदार समाधान आवताडे यांनी केले.