पंढरपूर (सोलापूर) -राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची झळ पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक नेत्यांनाही बसत आहेत. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुक माध्यमातून दिली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रचाराची जबाबदारी
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची जबाबदारी असणाऱ्या मुख्य नेत्यांपैकी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील एक आहेत. 4 एप्रिलपासून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरू केला होता. पोटनिवडणुकीमध्ये बैठका, सभा, कॉर्नर सभा याचा धडाका मोहिते पाटील यांनी लावला होता. अवताडे यांच्या प्रचारातील मुख्य शिलेदार असणाऱ्या मोहिते-पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भाजपाचा गोची वाढल्याचे बोलले जात आहे.