सोलापूर- वीज तोडणी तत्काळ थांबवा अशी मागणी करत सोलापुरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. 18 मार्च) वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. हे आंदोलन आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडले.
महावितरण कार्यालयाकडून वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. थकीत वीज बिलामुळे ग्राहकांचा व शेतकऱ्यांचा थेट विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या सक्तीची वीज बिल वसुली विरोधात जुनी मिल परिसरातील महावितरणच्या मुख्य कार्यालसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सरकारच्या वीज बिल माफीच्या भूलथापा
कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. या परिस्थितीला तोंड देत आता कुठे तरी शेतकरी सावरत आहे. पण, महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव विजबिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या. मात्र, वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारला शेतकऱ्यांची अवस्था समजत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महावितरणकडून वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून देण्यात यावी व तोपर्यंत एकही कनेक्शन तोडले जाऊ नये हे निवेदन सरकारकडे यापूर्वी देऊनही त्यावर कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे.