सोलापूर - माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. आयोध्येत श्रीराम मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम होत असताना सोलापूरातील वडाळा गावाच्या शिवारात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.
लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून वडाळ्यात श्रीराम मंदिर आयोध्येत आज (5 ऑगस्ट) श्रीराम मंदिराचा पायाभरणी सोहळा होत असताना उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा येथे देखील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून भव्य अशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सपत्नीक केले.
दिवंगत सुरेशचंद्र देशमुख यांनी 1998 साली स्थापन केलेल्या श्रीराम प्रतिष्ठान मंडळातर्फे संस्थेच्या आवारात हे भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात येणार आहे. होऊ घातलेल्या मंदिराचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. सोलापुरातले नामवंत वास्तूशिल्पकार अमोल चाफळकर यांनी या मंदिराचे संकल्पचित्र तयार केले आहे. पूर्णपणे बेसॉल्टच्या दगडात बांधल्या जाणार्या या मंदिरासाठी वडाळ्याच्या काही दानशूर नागरिकांनी आपल्या जमिनी अल्प किंमतीत उपलब्ध करून दिल्या आहेत. या मंदिरामध्ये विद्यार्थी व कर्मचार्यांकरिता योगसाधना करण्यासाठी ध्यान मंदिराचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे लोकमंगल समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून वडाळ्यात श्रीराम मंदिर
या भूमिपूजनाप्रसंगी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह स्मिता देशमुख, ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, संचालक मनीष देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, शोभा पाटील, शिवाजी पाटील, शिला पाटील, सचिवा अनिता ढोबळे यांच्यासह लोकमंगल परिवारातील सदस्य उपस्थित होते.