सोलापूर: महाराष्ट्र राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना, देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अपक्ष आमदाराचे टेंशन शिंदे गटाच्या नेत्यांनी वाढवले आहे. बार्शीमधील अपक्ष आमदारांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. शासकीय यंत्रणामार्फत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, तसेच आमदार राजेंद्र राऊत हे आपल्या समर्थकांमार्फत आपल्याला धमक्या देत आहेत, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप, शिंदे गटाचे बार्शी तालुका शिवसेना अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी केले आहेत.
700 कोटींच्या मालमत्तेची चौकशी होणे गरजेचे : बार्शीचे अपक्ष व भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बार्शी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र राऊत यांचे कुटुंब व त्यांच्या मित्र परिवाराची 700 कोटी रुपयांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघात शिंदे गटाच्या भाऊसाहेब आंधळकरांनी जाहीर पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. भाऊसाहेब आंधळकर यांनी माहिती देताना असेही सांगितले की,आमदार राजेंद्र राऊत यांच्याबाबत जी काही माहिती समोर आली आहे, ही सर्व माहिती आम्ही माहिती अधिकार कायद्यातून सरकारी कार्यालयातुन प्राप्त केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी व सरकारी कार्यालयानी ही माहिती दिली आहे, अशीही आंधळकर यांनी माहिती दिली.