महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Siddheshwar Mahayatreya In Solapur: सिद्धेश्वर महायात्रेयाला सुरुवात; 68 लिंगाना तैलाभिषेक व नगर प्रदक्षिणा - सिद्धेश्वर महायात्रा सोलापूर

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून सिद्धेश्वर महायात्रेयाला ग्रहण लागले होते. यंदाच्या या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. 900 वर्षांपासून ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रा पारंपरिक पद्धतीने साजरा केली जात आहे. सिद्धेश्वर पंचकमिटी व देवस्थान समितीने माहिती दिल्याप्रमाणे यंदाची महायात्रा ही 13 जानेवारी पासून हिरेहब्बू वाड्यापासून सुरू झाली आहे. मानाचे नंदीध्वज घेऊन मानकरी व सिद्धेश्वर महाराजांचे भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

Siddheshwar Mahayatreya In Solapur
सिद्धेश्वर महायात्रा, सोलापूर

By

Published : Jan 13, 2023, 4:28 PM IST

सिद्धेश्वर महायात्रेत सहभागी भाविक वर्ग

सोलापूर:ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची सिद्धेश्वर महायात्रा यन्नीमज्जन, तैलाभिशेक सोहळ्याने सुरू झाली आहे. सकाळी 8 नाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा झाली. पूजा झाल्यानंतर नगरप्रदिक्षणेस सुरुवात होते. यावेळी सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ सरकारतर्फे आहेर केला जातो.

सिद्धेश्वर महायात्रेत दर्शन घेताना भक्त

सरकारी आहेर ब्रिटिश काळापासून सुरू :68 लिंगाना तैलाभिषेक करण्यासाठी हिरेहब्बू वाड्यापासून याची सुरुवात होते. नंदीध्वज मिरवणूक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सरकारी आहेर दिला जातो. हा सरकारी मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. तेथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात 68 लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा केली जाते. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा केली जाते. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व 68 लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री 11 वाजेपर्यंत हिरेहब्बू वाड्यात दाखल होतात.

सिद्धेश्वर महायात्रेयाला सुरुवात

ही आहे आख्यायिका :लिंगागी अर्थात योग्य असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या कुटीबाहेर एक कुंभाराची कन्या दररोज सकाळी सडा-रांगोळी करत असे. ही गोष्ट सिद्धेश्वर महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या कुंभार कन्येला तिची अपेक्षा विचारली असता, तिने सिद्धेश्वरांशी विवाह करू इच्छित असल्याचे सांगितले. तेव्हा सिद्धेश्वरांनी अत्यंत नम्रपणे आपण लिंगागी असल्याने विवाह करू शकत नसल्याचे सांगितले; मात्र, तरीही कुंभार कन्येने हट्ट केल्यावर त्यांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. त्याच विवाहाचे प्रतीक म्हणून सोलापुरात हा विवाह सोहळा होतो, अशी आख्यायिका आहे. त्याला अक्षता सोहळा म्हणतात. या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ती कुंभार कन्या सती जाते, असे मानले जाते. त्यामुळे उद्या (बुधवारी) सोलापुरातल्या होम मैदानावर होमविधी पार पाडतो.

आशियातील सर्वांत मोठी यात्रा :अशा लौकिक अर्थाने विवाहाची इच्छा, हळदी, विवाह आणि होम म्हणजे प्रेमासाठी सती जाणे ही त्यागाची गोष्ट घडलेली असल्याचे सांगितले जाते. या घटनेला सर्व समाज साक्षीदार असल्याने या यात्रेत 7 समाजाच्या मानाच्या 7 काठ्या निघतात. लोकं मोठ्या श्रद्धेने या यात्रेला हजेरी लावतात. आशिया खंडातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख होतो; कारण ही यात्रा आजपासून एक महिनाभर चालते.

मागील वर्षी होते निर्बंध :नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर महायात्रेवर 2022 मध्ये कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. अशा परिस्थितीत सोलापुरातील सिद्धेश्वर भक्त आणि भाविकांनी एकत्र येऊन घरातच प्रतिकात्मक सिद्धेश्वर महायात्रा सजविली. याला भक्त आणि भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

यंदा भक्तांचा उत्साह शिगेला :महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक सिद्धेश्वर महायात्रेत दाखल होतात. यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख धार्मिक विधी असतो. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने भाविक सोलापुरात येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही सिद्धेश्वर महायात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा यात्रेला परवानगी मिळाल्याने भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मागील वर्षी जे धार्मिक विधी आणि महायात्रा पहावयास मिळाली नाही, त्याचे सर्व विधी आणि दर्शन प्रतिकात्मक महायात्रेतून करण्यात आले होते.

घरबसल्या सिद्धेश्वर भक्ती :गेल्या वर्षीघरबसल्या भक्तांना सिद्धेश्वर भक्ती करता यावी, यासाठी घरबसल्या सिद्धेश्वर भक्ती ही संकल्पना जेऊरे परिवाराला सुचली. यासाठी परिवारातील महाविद्यालयीन तरुणी पौर्णिमा जेऊरे यांनी प्रतिकात्मक सिद्धेश्वर महायात्रा साकारली होती. यासाठी तिने महायात्रेतील सर्व धार्मिक विधी प्रतिकात्मकरित्या साकारले. यामुळे सोलापुरातील भक्तांना घरबसल्या सिद्धेश्वर भक्ती करण्याची संधी लाभली. शहरातील अनेक भाविक व भक्त दर्शनासाठी जेऊरे यांच्या घरी आले होते. यामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक व धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सामाजिक कार्य, सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधी, गड्डा यात्रा अशी संपूर्ण सिद्धेश्वर महायात्रा साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details