सोलापूर Bawankule On Shinde :भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सकाळी सोलापुरातील भाजपाच्या मेळाव्यात उपस्थित होते. मेळाव्यानंतर माध्यमांना माहिती देताना बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेना आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून कसलीही ऑफर देण्यात आली नव्हती. (Praniti Shinde) चुकीची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात एका कार्यक्रमात बोलताना मला आणि माझ्या मुलीला भाजपाकडून ऑफर होती, असं सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय खळबळ उडाली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर पडदा टाकला आहे. (Lok Sabha Election 2024) यासंदर्भात सुशील कुमार शिंदे यांना आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला. त्यावर सुशील कुमार शिंदे म्हणाले की, बावनकुळे हे स्थानिक किरकोळ नेते आहेत. त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. आपल्याला भाजपाच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर आली होती. त्या नेत्याचे नाव विचारले असता. ते आपण सांगणार नाही अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.
अशांना उमेदवारीची शक्यता कमीच :सोलापूर लोकसभा निवडणुकीत 2019 साली भाजपाकडून निवडून आलेले विद्यमान खासदार डॉ. जय सिध्देश्वर महाराज हे जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. 'अब की बार चार सौ पार' असा नारा देणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही. भाजपाची केंद्रीय कार्यकारिणी लवकरच सोलापूर लोकसभा निवडणुकीचा उमेदवार घोषित करेल, अशीही माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता कायम आहे.