महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

590 ग्रामपंचायतींसाठी सोलापूर जिल्ह्यात सरासरी 80 टक्के मतदान - ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी

शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. एकूण 590 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 2325 केंद्रांवर प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 80 टक्के मतदान झाले आहे.

voting for gram panchayat election
सोलापूर जिल्ह्यात सरासरी 80 टक्के मतदान

By

Published : Jan 16, 2021, 6:51 AM IST

Updated : Jan 16, 2021, 8:46 AM IST

सोलापूर- जिल्ह्यातील 657 पैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित 590 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 2325 केंद्रांवर प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 80 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील किरकोळ घटनेचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले असून याची मतमोजणी सोमवारी त्या-त्या तहसील स्तरावर करण्यात येणार आहे.

590 ग्रामपंचायतींसाठी सोलापूर जिल्ह्यात सरासरी 80 टक्के मतदान


मतदानपूर्वी उमेदवाराचा मृत्यू-

दरम्यान, मतदानाला काही तास शिल्लक असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सायबण्णा बिराजदार (वय 58) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. बिराजदार यांना गुरूवारी हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

590 ग्रामपंचायतीसाठी इतक्या मतदारांनी बजावला हक्क-

590 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 6 लाख 62 हजार 904 पुरूष तर 6 लाख 23 हजार 2 असे एकूण 12 लाख 85 हजार 921 मतदार मतदानास पात्र होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 70.10 टक्के म्हणजेच 9 लाख 1 हजार 774 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या तासाभरात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

तळे हिप्परगा येथे दोन गटात दगडफेक-

तळे हिप्परगा गावात बोगस मतदानावरून भोसले आणि भिंगारे गटात तुफान दगडफेक झाली. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावांमध्ये ग्रामपंचायतची निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीमध्ये भिंगारे आणि भोसले गट एकमेकासमोर उभे होते. दरम्यान सकाळच्या सुमारास बारा वाजेपर्यंत गावांमध्ये शांततेत मतदान सुरू होते दुपारी अचानक प्रभाग क्रमांक एक मध्ये बोगस मतदान होत असल्याची चर्चा गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर भोसले आणि भिंगारे गट एकमेकांसमोर आले, मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झाला. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेकीत झाले, या दगडफेकीत भोसले गटाचा एक जण गंभीर जखमी झाला.

तालुका नुसार मतदान-

रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार बार्शी 81.99 टक्के, मोहोळ 82.37 टक्के, मंगळवेढा 79.59 टक्के, अक्कलकोट 75.86 टक्के, माढा 84.91 टक्के, सांगोला 82.00 टक्के, पंढरपूर 84.66 टक्के, माळशिरस 77.45 टक्के, करमाळा 84.04 टक्के, उत्तर सोलापूर 77.00 टक्के, मतदान झाले आहे.

कोरोना नियमावलीचा फज्जा-

ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक केंद्रांवर कोरोना संसर्गापासून बचावासाठी करण्यात आलेल्या नियमावलीचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले नाही. मतदारांच्या चेहर्‍यावर मास्क नव्हते. सॅनिटायझर केवळ नावालाच होते. थर्मलगनही कुठे दिसले नाहीत. मतदारांनाही कोरोनाचे भय नसल्याचेच दिसून आले. प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही कोरोनाच्या बाबतीत गाफीलपणा दिसून आला.

Last Updated : Jan 16, 2021, 8:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details