महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढ्याचा आवाज विधानसभेत घुमणार, एकाच वेळी ४ सुपुत्र विधानसभेत - १४ वी विधानसभा

१४ व्या विधानसभेचा रणसंग्राम संपला आहे. यामध्ये अनेक विक्रम झाले आहेत. यातच एक वेगळा विक्रम म्हणजे एकाच तालुक्यातले ४ आमदार एकाच वेळी विधानसभेत गेले आहेत.

एकाच वेळी माढ्याचे ४ सुपुत्र विधानसभेत

By

Published : Oct 27, 2019, 1:44 PM IST

सोलापूर - १४ व्या विधानसभेचा रणसंग्राम संपला आहे. यामध्ये अनेक विक्रम झाले आहेत. यातच एक वेगळा विक्रम म्हणजे एकाच तालुक्यातले ४ आमदार एकाच वेळी विधानसभेत गेले आहेत. माढा तालुक्याचे ४ सुपुत्र यावेळी विधानसभेत गेले आहेत. हा माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.


माढा तालुक्यातले ४ भूमिपुत्र यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यामुळे माढा तालुक्याचा आवाज आता विधानसभेत घुमणार आहे. एकाच वेळी ४ जण विधानसभेत जात असल्याने माढा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या ४ जणांमध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, त्यांचे बंधू संजयमामा शिंदे हे करमाळा मतदारसंघातून, प्रा. तानाजी सावंत हे भूम-परांडा-वाशी मतदारसंघातून आणि सुनिल कांबळे हे पुणे कँन्टोन्मेंट मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

१) बबनदादा शिंदे

बबनदादा शिंदे हे माढा तालुक्यातून सलग ६ वेळा निवडून आले आहेत. १९९५ पासून आमदार शिंदे हे आमदार आहेत. कारखानदारी क्षेत्रातले शिंदे हे मोठे प्रस्थ मानले जाते. त्यांच्या मतदारसंघात खूप दांडगा जनसंपर्क आहे. अनेक विकासकाम त्यांनी मतदारसंघात केली आहेत. त्याच बळावर शिंदे सलग सहाव्यांदा विधानसभेवर गेले आहेत. त्यांचे मूळ गाव हे माढा तालुक्यातील निमगाव (टें) आहे.


२) संजयमामा शिंदे

आमदार बबनदादा शिंदे यांचे संजयमामा शिंदे हे बंधू आहेत. संजयमामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून यावेळी निवडून आले आहेत. त्यांचे मूळ गाव हे माढा तालुक्यातील निमगाव (टें) आहे. संजयमामा शिंदेंनी २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यांनतर २०१९ ची लोकसभेची निवडणूक संजयमामा शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढवली तेथेही त्यांना अपयश आले. मात्र, संजयामामांनी संघर्ष सोडला नाही. अखेर त्यांना या विधानसभेत यश मिळाले. त्यांनी अपक्ष असणाऱ्या नारायण पाटील आणि शिवसेनेच्या रश्मी बागल यांचा पराभव केला.


३) प्रा. तानाजी सावंत

तानाजी सावंत हे शिक्षण क्षेत्रातील आणि कारखानदारी क्षेत्रातील मोठे नाव आहे. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात जलसंधारण मंत्री होते. ते यावेळी भूम-परांडा-वाशी मतदारसंघातून निवडून आले आहे. खर बघितलं तर भूम-परांडा-वाशी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.मात्र, या बालेकिल्ल्याला तानाजी सांवत यांनी सुरुंग लावत तेथे भगवा फडकवला आहे. त्यांचे मूळ गाव हे माढा तालुक्यातील वाकव हे आहे.

४) सुनिल कांबळे

सुनिल कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यांचे मूळ गाव हे माढा तालुक्यातील बावी हे आहे. मात्र, सध्या ते वास्तव्यास पुणे येथे आहेत. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details