पंढरपूर ( सोलापूर ) - आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली आहे. आज ( 9 जुलै ) सर्व पालख्यांचं पंढरपुरात आगमन झालं आहे. रविवारी आषाढी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. आळंदी आणि देहूहून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. नामदेव पायरीसोबत ते आपल्या विठुरायाचं दर्शनही घेणार आहेत. तसेच, चंद्रभागेत एनडीआरएफचं पथक वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी शनिवारी ( 9 जुलै ) आगमन होणार आहे.
वारकऱ्यांची पंढरीत लगबग -आळंदी आणि देहू वरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूर पर्यंत पोहोचले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रविवारी पहाटे 2.30 ते 4.30 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होईल. त्यानंतर पहाटे 5.30 विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन, पहाटे 5.45 ला नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावतील.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा -आषाढी वारीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा पंतप्रधानांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले. आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी आषाढी वारीनिमित्त लिहलेले पत्र विठ्ठल-रुक्मिणीला एक कोटींचा मुकुट -दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर पंढरी मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. यावर्षी आषाढी एकादशी साठी प्रशासनांना जोरदार तयारी केली असून तब्बल 15 लाख भाविक दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणीला तब्बल अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयांचे सोन्याचे मुखवट भेट म्हणून देण्यात आले. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार हे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सोन्याची मुकुट भेट देणार आहेत. विजयकुमार उत्तरवार हे उमरी येथील सोने चांदीचे व्यापारी आहेत. यापूर्वी अनेक भाविक भक्तांकडून विठ्ठलाला मोठ्या प्रमाणावर विविध आभूषने, अलंकार, दागिने देण्यात आले आहे. आता या विठ्ठलाच्या दागिन्यांमध्ये एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या मुकुटाची भर पडली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भाविक यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीला दिलेले सोन्याचे मुकुट हेही वाचा -Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात कधी झाली?, वाचा इतिहास