पंढरपूर -20 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आठ सदस्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात महापूजा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि मानाचे वारकरी असणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीने कार्याधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
विठुरायाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार
वैष्णवांच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक करणार आहेत. मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा सुरू होणार आहे. ही महापूजा तीन वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मानाच्या वारकर्यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपले मनोगत व्यक्त करणार असल्याची माहितीही जोशी यांनी दिली.