पंढरपूर ( सोलापूर ) -वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला म्हणजेच विठ्ठलाला महत्त्वाचे स्थान आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र, त्याचबरोबर चंद्रभागेच्या तिरी स्नान करुन तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र, याच चंद्रभागा नदीतील पाणी आरोग्यासाठी धोकादायक ( Chandrabhaga River Water is Dangerous ) असल्याचा अहवाल भूजल विभागाच्या ( Groundwater Department ) वतीने देण्यात आला आहे, अशी माहिती महर्षी वाल्मिकी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
साधु-संतांनी आपल्या अभंगांतूनन चंद्रभागा नदीचे पावित्र्य सांगितले आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची श्रद्धा स्थान असणारी चंद्रभागा गढूळ पाण्यामुळे खराब झाली आहे. चंद्रभागा नदी पात्रातील पाणी सांडपाणी, कचरा व शेवाळ यामुळे दुषीत झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक हे चंद्रभागा नदीचे पावित्र्य समजून स्नान करतात व तीर्थ म्हणून पितात. मात्र, भूजल विभागाकडून ( Groundwater Department ) देण्यात आलेल्या अहवालानुसार हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भाविकांनी या नदीपात्रात आंघोळ करू नये व तिर्थ म्हणून येथील पाणी पिऊ नये, असे आवाहनन अंकुशराव यांच्याकडून करण्यात आले आहे.