सोलापूर- संचारबंदीत रिकामा वेळ घालवण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करत माढ्यातील आसिफ गनी आतार या शिक्षकाने कलेशी एकरूपता दाखवली. कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे हुबेहुब चित्र त्यांनी रेखाटली आहेत. त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माढ्यातील आतार हे कुर्डूवाडीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत कला शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. आसिफ आतार यांनी आपली कला संचारबंदीतदेखील तेवतच ठेवली आहे. पोस्टर कलर, कलर पेन्सिल, ब्लॅक पेन्सिलच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटण्याचे काम सुरुच ठेवले आहे. आतापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते दादासाहेब साठे, या राजकीय मंडळीसह रंग आयुष्याचे चार भाग, तसेच माॅर्डन आर्टच्या माध्यमातून भटकंती करत असलेल्या समाजाचे चित्रण, हातावरचे पोट असलेला मदारी समाज, नर्तकी यासह अन्य चित्रे हुबेहुब काढली आहेत.