सोलापूर - राहिलेले वृक्षकोष आणि मत्स्यकोष सोलापूरात बसून पूर्ण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिली. चितमपल्ली यांचे मंगळवारी सोलापूरात आगमन झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांची भेटण्यासाठी रांग लागली होती. यावेळी चितमपल्ली यांनी आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. 45 वर्षापूर्वी सोलापूर सोडले होते. आता पुन्हा सोलापुरात परत आल्याने आनंद वाटत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चितमपल्ली यावेळी म्हणाले, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चितमपल्ली यांचा अरण्यऋषीपर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. प्रथम गुरू आई होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले. माझ्या आईला अरण्याचा भरपूर अभ्यास होता. आईमुळे जंगलाकडे आकर्षित झालो. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईकडून ऐकले. लिंबा मामा हे त्यांच्या आयुष्यातील दुसरे अरण्यगुरू होते. सुगरण पक्षाची घरटी पहिल्यांदा दाखवली. तर हणमंत मामा यांनीही अरण्याचे वेगळे जग दाखवले. पाखरांची नावे हणमंत मामाने सांगितली. हणमंत मामांनी सापांविषयी भरपूर ज्ञान दिले. त्यांनी असंख्य अशा वन्य प्राण्यांच्या नावे सांगितली. त्यामुळे वन खात्यात नोकरी करताना याचा भरपूर उपयोग झाला.