सोलापूर -सोलापूर शहर व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या आयुष्यात झाकून पाहिले असता, त्या अत्यंत हालाखीचे जीवन जगत असल्याचे समोर आले. वेळेवर मानधन मिळत नाही, लाभार्थी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतंत्र इमारत नाही, निवृत्त झालेल्या अनेक अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन देखील मिळालेले नाही, अशा अनेक अडचणींचा सामना या सेविका करतात. मदतीचे आश्वासन देऊन सरकारकडून फक्त पिळवणूक होत असल्याची खंत अनेक सेविकांनी व्यक्त केली. मरणयातना भोगत असलेल्या या सेविकांना शासनाने वेळेवर मानधन द्यावे, निवृत्तीनंतर निवृत्ती मोबदला लवकर द्यावा, अशा अनेक मागण्या त्यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.
अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे -
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 400 अंगणवाडी केंद्र आहेत. सोलापूर शहर व ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनीस अशा एकूण 7 हजार 20 महिला काम करतात. शहर व जिल्ह्याची अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सेविका म्हणून 8 हजार 500, मिनी सेविका म्हणून 5 हजार 975, मदतनीस म्हणून 4 हजार 500, अशा मानधनावर काम करावे लागत आहे. यामध्ये यांना महागाई भत्ता, प्रवास खर्च असे काहीही लाभ मिळत नाहीत. अशा तुटपुंज्या मानधनावर काम करता करता आयुष्य संपून जाते. या तुटपुंज्या मानधनावर 10 वर्षे नोकरी केल्यास 3 टक्के वाढ, 20 वर्षानंतर 4 टक्के वाढ आणि 30 वर्ष नोकरी केल्यावर 5 टक्के मानधन वाढ दिली जाते.
सोलापूर शहरातील सर्व अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खोल्यांमध्ये-
सोलापूर शहरात शासनाने एक रूपया देखील अंगणवाडीच्या इमारतीसाठी खर्च केलेला नाही. शहरातील सर्व अंगणवाड्या या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. येथे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत. एखादी 10 बाय 10ची खोली भाड्याने घेऊन अंगणवाडी केंद्र सुरू केलेली आहेत. या खोल्यांचे भाडे देखील वेळेवर मिळत नसल्याने कोणीही अंगणवाडी केंद्रांना जागा भाड्याने देत नाही.