सोलापूर- भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी व काँग्रेसच्या एकाने अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. राणा जगजितसिंह व धनंजय महाडिक तसेच काँग्रेसचे जयकुमार गोरे यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, भाजपमध्ये विरोधकांचे सर्वच नेते येत आहेत. असेच राहिले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांशिवाय विरोधात कुणीच शिल्लक राहणार नसल्याचे म्हणत विरोधकांच्या महागळतीवर टीका केली. शरद पवार यांनी मागील 15 पंधरा वर्षाचा लेखाजोखा द्यावा. युपीए सरकारने भष्ट्राचाराशिवाय काहीच नाही केले नसून तब्बल 12 लाख करोड रुपयाचा घोटाळा केला आहे. त्यामुळे मागील सरकारमधील घोटाळ्यांनी मोठा खड्डा पडला आहे. तो भरुन काढण्यासाठी फडणवीसांना पुन्हा एकदा संधी द्या. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात विकास घडवून आणू, असे शाह म्हणाले. तसेच 370 कलम रद्द केल्याने भारत अखंड झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर एकही गोळी काश्मीरात चालली नाही. मात्र राहुल गांधी आणि शरद पवार याच्या विरोधात आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यांचा फायदा पाकिस्तान घेत असल्याचा आरोप शाहांनी केला.