पंढरपूर (सोलापूर) -बार्शी शहरातील भोसले चौक येथील जवाहर गणेश मंडळाने गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी एक जणाचा वाढदिवस फटाके फोडून साजरा करत आला. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हेही उपस्थित होते. मात्र वाढदिवसात नियमापेक्षा जास्त जणांची उपस्थिती होती. या कारणावरून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके व आमदार राजेंद्र राऊत यांच्यात यावेळी खडाजंगी झाली. यावेळी गणेश मंडळाच्या अध्यक्षासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शीत तालिबानी राज्य आहे का?
गणेश मंडळात गणेशाची आरती करण्यात आली असल्याचे म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी पोलीस निरीक्षक शेळके यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर निरीक्षक शेळके म्हणाले आरती करण्यासाठी चार जणांना परवानगी आहे. त्यावेळी राजेंद्र राऊत म्हणाले हे काही तालिबानचे राज्य आहे का? त्यानंतर पोलीस निरीक्षक शेळके यांनी कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावर बोट ठेवून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच गणेश उत्सव साजरा केला जात असल्याचे आमदार राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. याच कारणावरून पोलीस निरीक्षक रामदास शेळके व आमदार राजेंद्र राऊत यांच्यात खडाजंगी झाली.