सोलापूर - जिल्ह्यातील सर्व धार्मिक देवस्थाने 31 मार्च 2020पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, मंदिरांतील धार्मिक विधी आणि नित्योपचार सुरू राहतील. सर्व देवस्थानांच्या प्रमुखांनी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचे मान्य केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर दिली.
सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने बंद कोरोना विषाणुच्या संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शंभरकर यांनी जिल्ह्यातील देवस्थानच्या प्रमुखांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात याबाबत बैठक पार पडली.
हेही वाचा -Coronavirus : भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात 39 जण आढळले
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ, स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, मारुती मंदिर, गौडगाव, दर्गाह, हैदरा, सिदेश्वर मंदिर देवस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंदिरांतील पूजा सुरू ठेवताना आरोग्य विभागांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही शंभरकर यांनी केले.
लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, लग्न आणि कौटुंबिक समारंभ गर्दी न करता करावेत किंवा शक्य असल्यास लांबणीवर टाकावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले. बाजार समितीतील व्यवहार तीन सत्रात करावेत अशा सूचना बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या असून त्याची कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.