सोलापूर -शहरातील सर्व खासगी रुग्णालये सुरू राहणार असल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील जवळपास सर्व खासगी रूग्णालये बंद ठेवण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याच्या नोटीसा बजावल्यानंतर सोलापूरमधील सर्व डॉक्टरांनी रुग्णालय सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सोलापुरातील जवळपास सर्व खासगी रुग्णालय बंदच होते. तब्बल दोन महिने रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोना सोडून इतर आजाराचे जे रूग्ण होते त्यांच्यावर उपचार होत नव्हते. अनेक रूग्णांवर उपचार देखील केले जात नव्हते. अनेक रुग्णालय हे फक्त सांगण्यासाठी उघडे आहेत असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष त्या रुग्णालयामध्ये कोणावरही उपचार केले जात नव्हते.