सोलापूर- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अक्कलकोट तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. या अतिवृष्टीमुळे बोरी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील सांगवी गावातील अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. त्यामुळे जवळपास ११३ कुटुंबे या पुराच्या तडाख्यात सापडली. तर ११ घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाहीतर शेतातील ऊस, मका, भाजीपाला आदी पिकेही नष्ट झाली आहेत. आता सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता अक्कलकोट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी सांगवी ग्रामस्थांना सहाय्यता निधी मिळावी, अशी मागणी केली जाणार आहे.
14 आणि 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगवी गावावर मोठा जलप्रलय आला. बोरी नदी शेजारी हे गाव असल्याने बोरी नदीला आलेल्या पुरात हे गाव पाण्याखाली गेले. रातोरात सांगवी मधील ग्रामस्थांनी एका शाळेचा आधार घेतला. मात्र, पाण्याची पातळी वाढून बोरीच्या पुराने शाळेलाही आपल्या कक्षेत घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी हातामध्ये जे साहित्य मिळेल ते साहित्य घेऊन अंधारात धावत शाळे बाहेर पडून सुरक्षित ठिकाण गाठले आणि ती काळरात्र जागून काढली.