अक्कलकोट (सोलापूर) - राज्य शासनाने पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली. यानंतर आजपासून (सोमवारी) अक्कलकोट येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दिवसभर मोठी गर्दी केली. आठ महिन्यांपासून आतुर झालेल्या भाविकांनी सोमवारी पहाटे पासूनच दिवसभर वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात दर्शनासाठी व स्वामीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान -
श्री स्वामी समर्थ महाराजांचे राज्यभरात लाखो भाविक आहेत. सोलापूर शहरापासून अवघ्या 50 किमी अंतरावर असलेल्या अक्कलकोट शहराला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामुळे अनन्य साधारण महत्त्व आहे. लाखो भाविक अक्कलकोट येथे दर्शनासाठी दाखल होतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंदिर बंद करण्यात आले होते. यानंतर तब्बल आठ महिने राज्यातील मंदिरे बंद होती. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने दिलेल्या आदेशनव्ये राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आली आहेत. आठ महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळे याठिकाणी भक्तांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे चित्र पहावयास मिळाले.