सोलापूर - निवडणुकांमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता तर चक्क अजित पवारांनीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देऊ नका असे म्हटले आहे. हे घडले आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये. झाले असे की, करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, असे असतानाही पक्षाने अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनापाठिंबा जाहीर केला आहे. घड्याळाला मतंन देता अपक्षाला मत द्या असे ते म्हणाले आहेत. सफरचंद या चिन्हावर तुम्ही मतदान करा असे अजित पवार म्हणाले. यावर बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील अजित पवारांना शेतकऱ्याचा हिसका दाखवू असे म्हणाले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की, करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा अर्ज वेळेत माघारी घेणे शक्य झाले नाही. मात्र, तेथे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. एकंदरीतच करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर हे असताना देखील अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना मतदान करा ते आपले अधिकृत उमेदवार आहेत असे अजित पवार यांनी भर सभेत सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.