पंढरपूर (सोलापूर) - मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत नाहीत, यावर भाजपकडून होत असलेल्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून देश चालवितात. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कांत असतात, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण, पुणे येथील कोरोनासह शेती नुकसानीचा आढावा घेतल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीच्या तीरावर घाटाच्या भरावाखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनास्थळी भेट देण्यासाठी व पंढरपुरात पुरामुळे झालेल्या माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरला आले होते. सिंचन घोटाळा प्रकरणी विविध एजन्सीकडून केंद्र सरकारने चौकशी चालू केल्या आहेत. हे प्रकरण न्यायालय प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यास अजित पवारांनी नकार दिला.
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे भरीव निधीकरता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारचे जीएसटीचे केंद्र सरकारकडे सुमारे ६० हजार कोटी अडकले आहेत. आधी कोरोना मग राज्यात अतिवृष्टी आल्यामुळे राज्याच्या तिजोरी पैसे नसल्याचे माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. पुढे पवार म्हणाले, घाटाच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दिसत आहे. घाटाच्या कामात काळी माती दिसत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष होत आहे. घाटाच्या कामाची माहिती घेण्यासाठी पुण्यामध्ये बैठक घेणार आहे. या बैठकीला पंढरपुरातील अधिकारी व आमदार भारत भालके उपस्थित राहणार आहेत. या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.