सोलापूर - प्रशासनाच्या परवानगी विना नंदीध्वज उभारल्याने सोलापूरात वाद उसळला आहे. नऊशे वर्षांपासूनची सिद्धेश्वर यात्रेची परंपरा यावर्षी कोरोनामुळे शासन परवानगीनेच काढावी लागणार आहे. सिद्धेश्वर यात्रा सुरु होण्यापूर्वी नंदीध्वज मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र अद्याप शासनाची परवानगी मिळाली नसतानाही जगदीश पाटील यांनी राहत्या घरासमोर नंदीध्वज उभारून पत्नीसह पूजा केली. त्यामुळे सिद्धेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू हे जगदीश पाटील यांच्या घरासमोर दाखल झाले आणि संताप व्यक्त केला. जगदीश पाटील आणि राजशेखर हिरेहब्बू यांच्यात खडाजंगी झाली.
परवानगी विनाच नंदीध्वजाची पूजा
जगदीश पाटील यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पत्नीसह नंदी ध्वजाची पूजा केली. प्रशासनाने सिद्धेश्वर महायात्रेच्या कोणत्याही धार्मिक विधीला परवानगी दिली नाही. सिद्धेश्वर मंदिराचे पदाधिकारी आणि राजकीय नेते आमदार आदी महायात्रेच्या परवानगीसाठी प्रयत्न करत आहेत. पण जगदीश पाटील यांनी अचानक नंदीध्वज पूजा केल्याने प्रशासन कडक निर्णय घेईल आणि प्रशासनासोबत होत असलेल्या बैठका निष्फळ होतील.
सिद्धेश्वर भक्तांच्या मनात प्रशासना विरोधात खदखदकोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीला अनेक नियमावली आल्या आहेत. दरवर्षी सिद्धेश्वर महायात्रा संपन्न होण्या अगोदर एक महिन्याआधीपासून काठी सराव किंवा नंदीध्वज सराव केला जातो. यंदा या सरावाला देखील प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सिद्धेश्वर भक्तांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. जगदीश पाटील यांनी अचानक काठी किंवा नंदीध्वजाची पूजा करून एक ठिणगी फेकण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सोलापूर शहरात सिद्धेश्वर भक्तांत काठी उठाव किंवा नंदीदध्वज उठाव होण्याची शक्यता झाली आहे.